Page list

क्रियापद

 🌷क्रियापद 🌷


जो शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो व वाक्याला अर्थपूर्ण करतो त्या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद’ असे म्हणतात. किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्‍या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद’ असे म्हणतात.

उदा. (१) रमेश अभ्यास करतो.  (२) दिनेश जेवण करण्यास बसला. 

वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द जसे करतो,बसला इत्यादी क्रिया दाखवितात व त्यामुळे वाक्य पूर्ण होते म्हणून ही क्रियापदे आहेत. 

•• क्रियापदाचे प्रकार ••

🥀क्रियापदाचे एकूण १४ प्रकार पडतात.🥀


(१)सकर्मक क्रियापद

(२)अकर्मक क्रियापद

(३)स्थिति व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे

(४)द्विकर्मक क्रियापदे

(५)उभयविध क्रियापदे

(६)संयुक्त क्रियापद / सहायक क्रियापद

(७)सिद्ध क्रियापद

(८)साधित क्रियापदे

(९)प्रयोजक क्रियापदे

(१०)शक्य क्रियापद

(११)अनियमित किंवा गौण क्रियापद

(१२)भावकर्तृक क्रियापद

(१३)करणरूप क्रियापद (होकारदर्शक)

(१४)अकरणरूप क्रियापद (नकारदर्शक) 

•••••••••••••••••••••••••••



(१)सकर्मक क्रियापद 


 ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदाला ‘सकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.

जसे – (१) राजुने पुस्तक वाचले.

या वाक्यात ‘राजुने वाचले’असे म्हटले तर त्याचा अर्थ पूर्ण होत नाही.येथे ‘वाचले’ ह्या क्रियापदाला ‘पुस्तक’ ह्या कर्माची गरज आहे.म्हणून ‘वाचले’ हे सकर्मक क्रियापद आहे. 


(२)अकर्मक क्रियापद 


 ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नाही.त्याला ‘अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.

जसे. मी जेवलो. तो धावला. ती आली. 

वरील वाक्यात कर्माची आवश्यकता नाही म्हणून जेवलो,धावला,आली इत्यादी अकर्मक क्रियापदे आहेत. 


(३) स्थिति व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे 


एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे याला स्थित्यंतर म्हणतात तर आहे ती स्थिती दर्शविणे याला ‘स्थितिदर्शक क्रियापद’ म्हणतात.

जसे. (१) दशरथ राजा होता.(स्थिती) (२) मी दुकानदार आहे.(स्थिती) (३) तो वकील झाला.(स्थित्यंतर) 


(४) द्विकर्मक क्रियापदे 


 ज्या वाक्यात एकाच कर्त्याच्या संबंधात दोघांविषयीच्या क्रिया घडतात म्हणून जेथे दोन कर्मे दिसतात अशा क्रियापदांना ‘द्विकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात.

जसे.(१) शंकर कुत्र्याला दगड मारतो.(कुत्र्याला,दगड-कर्म)

       (२) गणेश सुरेशला गाणे शिकवतो.(सुरेश ,गाणे-कर्म) 


(५) उभयविध क्रियापदे 


एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही तर्‍हेने वापरता येते.त्यास ‘उभयविध क्रियापद’ असे म्हणतात.

जसे :- (१) त्याने घराचे दार उघडले.(सकर्मक)

          (२) त्याच्या घराचे दार उघडले.(अकर्मक) 


(६) संयुक्त क्रियापद / सहायक क्रियापद  


ज्या वाक्यात वाक्य पूर्ण होण्याची क्रिया करण्यासाठी धातुसाधित शब्दाच्या मदतीला क्रियावाचक शब्दाचे सहाय्य घ्यावे लागते त्यास ‘संयुक्त क्रियापद’ किंवा ‘सहायक क्रियापद’ असे म्हणतात.

जसे- क्रीडांगणावर मुले खेळू लागली.(खेळू-धातुसाधित,लागली-क्रियावाचक शब्द) 


(७) सिद्ध क्रियापद   


क्रियापदांमधील मूळ धातूला सिद्ध धातू असे म्हणतात.अशा धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना ‘सिद्ध क्रियापदे’ असे म्हणतात.

उदा. कर-करतो. बस-बसतो, जा-जातो. 


(८) साधित क्रियापदे  


नाम,विशेषण,धातू व अव्यय अशा विविध जातींच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणार्‍या क्रियापदांना ‘साधित क्रियापदे’ असे म्हणतात.

उदा. (१) नामसाधित :- तो चेंडू लाथाळतो. (लाथ)

        (२)विशेषण साधित :- त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. (स्थिर)

        (३)अव्ययसाधित- धर्माच्या बंधंनामुळे माणसे मागासली. (मागे)

        (४)धातूसाधित-आम्ही ही मोटार मुंबईहून आणवली. (आण) 


(९) प्रयोजक क्रियापदे


 ज्या क्रियापदाचा कर्ता स्वत: क्रिया करीत नसून दुसर्‍या कोणाचीतरी क्रिया करण्यासाठी योजना करतो.त्यास ‘प्रयोजक क्रियापद’ असे म्हणतात.

जसे-(१)आईने नीलाकडून कविता पाठ करविली.

        (२)आई मुलाला चालविते. 


(१०) शक्य क्रियापद 


ज्या वाक्यात क्रिया करण्याची कर्त्याला शक्यता आहे,असा अर्थ व्यक्त होतो,तेव्हा त्यास ‘शक्य क्रियापद’ असे म्हणतात किंवा वाक्यामधील ज्या क्रियापदाव्दारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते. त्या क्रियापदाला शक्य क्रियापदे म्हणतात. 

जसे- (१) साविताला आंबट दही खाववते.

         (२)मला आता काम करवते.

        (३)माझ्याने कडू कारले खाववते. 


(११) अनियमित किंवा गौण क्रियापद 


ज्या क्रियापदांमधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही,अशा क्रियापदांना ‘अनियमित’ किंवा ‘गौण क्रियापदे’ असे म्हणतात.

जसे :- नये,नको,पाहिजे,नव्हे,नाही,आहे. इत्यादी

(१)असे वागणे बरे नाही. (२)येथून जाऊ नको. (३)मला पुस्तक पाहिजे.इत्यादी 


(१२) भावकर्तृक क्रियापद  


वाक्यात क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो;परंतु काही वाक्यात तो क्रियापदातच सामावलेला असतो; म्हणून अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापदे’ असे म्हणतात.किंवा जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापद’ असे म्हणतात. 

जसे-(१)आज दिवसभर सारखे गडगडतेय.(गडगड होते.)

       (२)गावी जाताना तासगावजवळ उजाडले.(उजेड झाला.) 


(१३) करणरूप क्रियापद (होकारदर्शक) 


 ज्या क्रियापदांमधून होकार दर्शवला जातो त्यास ‘करणरूप क्रियापद’ असे म्हणतात.

जसे  :- (१) नेहमी व्यायाम करावा.

            (२) धूम्रपान टाळावे.

            (३) नेहमी खरे बोलावे. 


(१४) अकरणरूप क्रियापद (नकारदर्शक) 


 ज्या क्रियापदांमधून नकार सुचवला जातो त्यास ‘अकरणरूप क्रियापद’ असे म्हणतात.अशा वाक्यात शक्यतो नये,नको,नाही,नव्हे,न यासारखे नकारदर्शक शब्द असतात.

जसे :- (१)बाहेर जाऊ नका.

           (२)कधीही चोरी करू नये.

           (३)धूम्रपान करू नये.

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...