उन्हाळ्यात बेडूक कोठे जातात ?
पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या की रात्री
बेडकांचा आवाज ऐकू येऊ लागतो. काल
परवापर्यंत ज्यांचा काहीच पत्ता नव्हता असे हे
बेडूक अचानक कोठून आले, पावसाबरोबर
पडले की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो.
आॅक्टोबर महिन्यात, पावसाळा संपल्यानंतर
थोड्याच दिवसांत,बेडूक पुन्हा अदृश्य होतात.
म्हणजे एक पावसाळा संपल्यापासून पुढचा
पावसाळा सुरू होईपर्यंत बेडूक नाहीसे होतात.
अचानक कुठे निघून जातात ते ?
बेडकांना पाण्यात किंवा पाण्याजवळ रहावे
लागते. त्यांची कातडी जर कोरडी पडली तर
ते मरतात. स्वत:ची कातडी ओली ठेवणे
बेडकांना पावसाळ्यात सहज शक्य होते.
पावसाळा संपला की मात्र कोरड्या हवेत राहणे
बेडकांना शक्य नसते. अशा वेळी बेडूक
ओलसर जमीन शोधून तेथे पायाने खोल खणत
जातो आणि स्वतःला गाडून घेतो.एकदा असे
जमिनीत गेले की तेथे त्याला स्वस्थ पडून
राहण्याखेरीज दुसरे गत्यंतरच नसते.सर्व हालचाल
बंद झाल्यामुळे त्याला अन्न, प्राणवायू, या गोष्टी
अगदी थोड्या प्रमाणात पुरतात. पावसाळ्यात
खाऊन घेतलेल्या अन्नाच्या साठ्यावर उरलेले
७-८ महिने तो सहज घालवितो. ओलसर
जमिनीतून जो थोडासा प्राणवायू येतो तो
त्याला पुरतो. शरीरातील पेशींना अगदी थोडे
अन्न आणि प्राणवायू पुरवायचा असल्यामुळे
त्याचे हृदयही फार मंदपणे काम करते. या त्याच्या
स्थितीला ऋतुनिद्रा किंवा शीतकालसमाधी असे
म्हणतात.
जमिनीत भोवताली सारा अंधार असताना
पावसाळा आल्याचे बेडकाला कसे कळते ?
सात जून उजाडला, पावसाळा सुरू झाला, हे
कळायला तो काय माणूस थोडाच आहे ?
पाऊस पडला की पाणी जमिनीतून झिरपत
आत जाते. पाण्याच्या स्पर्शामुळे तो ऋतुनिद्रेतून
जागा होतो. त्याला पावसाळा आल्याची वर्दी
मिळते. सगळे बेडूक मग अचानक जमिनीवर
येतात. आणि 'हे सगळे एकदम कुठून आले,'
असा आपल्याला मात्र प्रश्न पडतो.
उन्हाळ्यात जर तुम्ही थोडे खोलवर खणलेत
तर गाढ झोप घेत असलेला बेडूक तुम्हाला
एखादे वेळी दिसू शकेल.
No comments:
Post a Comment